पाकिस्तानचा शेअर बाजार भारताच्या कारवाईनंतर कोसळला   

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. दोन्ही देशांमधील बिघडत्या परिस्थितीचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावरही झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी पाकिस्तान शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली असून, तो विक्रमी २५०० हून अधिक अंकांनी कोसळला आहे.
 
पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीएसएक्समध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत २५०० अंकांची घसरण झाली होती. केएसई-१०० निर्देशांक २५०० अंकांनी घसरून एक लाख १४ हजार ६०० वर पोहोचला होता. पण, नंतर त्यात थोडी सुधारणा झाली असून, ही घसरण १५०० अंकांपर्यंत खाली आली आहे.
 
पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून सातत्याने केल्या जाणार्‍या कारवाईमुळे आणि आयएमएफने २०२५ च्या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज ३ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांपर्यंत कमी केल्यामुळे, पाकिस्तान शेअर बाजारमध्ये मोठी घसरण पाहावयास मिळाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ साठी आयएमएफने पाकिस्तानच्या जीडीपी वाढीचा अंदाज ३ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांपर्यंत कमी केल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास कमकुवत झाला आहे. याशिवाय, फिच रेटिंग्जने इशारा दिला आहे, की पाकिस्तानी रुपया जूनपर्यंत प्रति डॉलर २८५ रुपयांपर्यंत घसरू शकतो आणि आर्थिक वर्ष २०२६ च्या अखेरीस तो २९५ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
 
पहलगाम हल्ल्यानंतर वाढता तणाव, भारताने केलेली कठोर कारवाई आणि काश्मीरमधील वाढती अस्थिरता आणि दहशतवादी घटनांबद्दलची चिंता यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना नकारात्मक झाल्या असून, त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे.

जागतिक बँकेचा पाकिस्तानला इशारा

जागतिक बँकेने पाकिस्तानला इशारा दिला आहे, की आता त्यांना मजबूत आणि शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागेल. येत्या काळात पाकिस्तानच्या शेअर बाजारात आणखी घसरण होऊ शकते. जर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणाव आणि आर्थिक आकडेवारीत सुधारणा झाली नाही, तर पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
 

Related Articles